दिनविशेष

 • राधू करमाकर

  आज भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर राधू करमाकर यांचा स्मृतीदिन. जन्म.१४ ऑक्टोबर १९१६ प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, राधिका जीवन करमाकर, ज्यांना राधू करमाकर म्हणून अधिक ओळखले जाते, राधू हे नाव राज कपूर यांनी सुचवले होते. राधू करमाकर हे राज कपूर यांचे सर्वात विश्वासू सिनेमॅटोग्राफर होते. 'आवारा' आणि 'श्री 420' सारख्या क्लासिक चित्रपटांची त्यांच्या सुंदर छायाचित्रणाची आजही आठवण केली जाते. त्याच्या दोन मोठ्या भावांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे कौटुंबिक सोन्याचे दागिन्यांचे दुकान बंद होण्याच्या मार्गावर होते आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने १९३१ मध्ये राधू यांना कमावणे आणि पुढील शिक्षण घेणे भाग पडले. त्यांना त्यांच्या तिसऱ्या भावाकडे कलकत्त्याला जावे लागले. करमाकर यांनी व्यापारी ब्रोजेन्द्रल राय यांची मुलगी बानी (वाणी) राय यांच्याशी लग्न केले. सुरुवातीच्या दिवसांत, जेव्हा त्यांनी आपला 'स्वर्णकारी'चा कौटुंबिक व्यवसाय सोडून चित्रपटाकडे वाटचाल करणार असल्याचे जाहीर केले. १९३९ मध्ये ते जतीन दास यांच्यासोबत त्यांचे पहिले सहाय्यक म्हणून मुंबईत आले आणि ए.के. कामदार यांच्या दिग्दर्शनाखाली सिर्को प्रॉडक्शनसोबत 'स्वामी' आणि 'नई दुनिया' मध्ये काम केले. राधु करमाकर यांनी कोलकाता येथे आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात १९४५ साली आलेल्या 'किस्मत की धनी' या चित्रपटा पासून केली, त्यानंतर नितीन बोस दिग्दर्शित बॉम्बे टॉकीजच्या १९४६ साली आलेल्या 'मिलन' साठी सिनेमॅटोग्राफी केली. राधू करमाकर यांची गणना त्यावेळी जगातील दहा महान सिनेमॅटोग्राफरमध्ये होत असे. त्यांच्या काही चित्रपटांचा सोव्हिएतमधील सिनेमॅटोग्राफी अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला गेला होता. ‘कैमरा : मेरी तीसरी आँख’हे राधू करमाकर यांचे आत्मचरित्र आहे, जे त्यांच्या निधनानंतर बारा वर्षांनी त्यांच्या पत्नी वाणी करमाकर आणि त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांच्या डायरी आणि लेखाच्या आधारे तयार केले. मूळतः इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्राचे हिंदी भाषांतर कवी-कथा लेखक विनोद दास यांनी केले आहे. राधू करमाकर यांचे ५ ऑक्टोबर १९९३ रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार अपघातात निधन झाले.

 • संजीव अभ्यंकर

  आज मेवाती घराण्याचे गायक संजीव अभ्यंकर यांचा वाढदिवस. जन्म. ५ ऑक्टोबर १९६९ पं.संजीव अभ्यंकर हे आजचे आघाडीचे नव्या दमाचे चतुरस्र गायक म्हणून परिचित आहेत. विविध रागांचा विविधांगी अभ्यास करत त्यांनी मेहनतीतून आज नवीन पिढीतील महत्त्वाचे गायक म्हणून स्थान मिळवलं आहे. पं. जसराज यांचे पट्टशिष्य आज अगदी कीर्ती शिखरावर विराजमान आहेत म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. अतिशय गोड गळा, पल्लेदारपणा आणि स्वरांचा दाणेदारपणा ही त्यांची गानवैशिष्टय़े त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून लक्षात येतात. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णत: बदलली. गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती होत होती. अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणाऱ्या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली. ते देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सवच नाहीत, तर अमेरिकेत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पूर्व आफ्रिका या भागांतही संजीव अभ्यंकरांची गायकी पोचली आहे. शास्त्रीय गायनासोबत आजकाल ते स्वत:च्या स्वतंत्र अल्बममधील अभंग, भजने, भावगीते असे प्रकारही सादर करतात हे लक्षात येत आहे. या सुगम संगीतावरही त्यांच्या सुरेल गायकीची मोहर उमटली आहे. 'गॉडमदर' चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. संजीव अभ्यंकर आणखी एक वैशिष्टय़ सांगता येईल की, बहुतांश कार्यक्रमात ते नव्या रागांचा नवा संच निवडतात. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे. संजीव अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 • विजय सरदेशमुख

  आज ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रसार करणारे ज्येष्ठ गायक पंडित विजय सरदेशमुख यांचा स्मृतीदिन. जन्म. २३ जून १९५२ विजय सरदेशमुख यांचे वडील पं.विठ्ठलराव सरदेशमुख हे गायक आणि पेटीवादक आणि संगीत व संस्कृतचे उत्तम जाणकार आणि शिक्षक. घरातूनच विजय सरदेशमुखांना संगीताचा वारसा लाभला. पं. विठ्ठलराव सरदेशमुख हे पं. भीमसेनजींना साथ करीत असत, त्यामुळे घरी पं. भीमसेनजी, सुरेशबाबू माने, विदुषी माणिक वर्मा, पं. कुमार गंधर्व , पं. वसंतराव देशपांडे, विदुषी सिद्धेश्वेरी देवी अशा अनेक सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाच्या गायक मंडळींची उठबस आणि चर्चा, गायन ही नित्याची गोष्ट होती. वडील गायनाचे वर्गही घरातच घेत असत. त्यामुळे गायन, गायनाविषयी बोलणे हे विजय सरदेशमुख मन लावून ऐकत असत, ग्रहण करीत असत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचं वडिलांकडे गायनाचं शिक्षण सुरू झालं. त्या वेळच्या अकरावीमध्ये संगीत विषय घेऊन त्यात ते पहिले आले. बाराव्या वर्षी कुमारांना प्रथम तानपुऱ्यावर साथ केली. तेव्हापासून त्या झंकारणार तानपुऱ्यांची आणि गायकीची ओढ त्यांना लागली. वडील किराणा घराण्याचे विचार, गायकी अनुसरत असूनही कुमारांकडे शिकायला त्यांनी काहीच हरकत घेतली नाही हा त्यांचा विशेष दहाव्या वर्षांपासूनच विजयजींनी रेडिओवर गायन सुरू केलं. १९६४ सालापासून ते कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर साथ करत राहिले. तानपुऱ्यातून राग-संगीत कसं उमलत- फुलत जातं याचं जणू शिक्षणच या साथीतून मिळत गेलं. विजय सरदेशमुखांची पहिली जाहीर मैफल झाली तीच मुळी विदुषी हिराबाई बडोदेकरांच घरी. १९७० सालापासून विजय सरदेशमुखांनी कुमारजींकडे गायन शिकायला सुरुवात केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते. विजय सरदेशमुख यांच्या गायनाच्या एचएमव्ही आणि अलूरकर म्युझिक हाऊसने ध्वनिफिती आणि सी.डी प्रकाशित केल्या आहेत. कुमारजींची गायकी युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यांना आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे २०११ साली वत्सलाबाई जोशी हा पुरस्कार मिळाला होता. तसेच वसंतराव देशपांडे पुरस्कार मिळाला होता. विजय सरदेशमुख यांचे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले.

 • भगवतीचरण वर्मा

  आज आधुनिक हिंदी कादंबरीकार, कथाकार व कवी भगवतीचरण वर्मा यांचा स्मृतीदिन. जन्म. ३० ऑगस्ट १९०३ उत्तर प्रदेशातील उन्नाओ जिल्ह्यात शफीपूर या छोट्या खेड्यात. जगमोहन विकसित यांच्या प्रेरणेने भगवती चरणांनी मैथिली शरणांचे भारतभारती काव्य अभ्यासले व त्या प्रभावातून सातव्या इयत्तेत असल्यापासूनच ते स्वतः कविताही रचू लागले. बी.ए. (१९२६), एल् एल्.बी. (१९२८) झाल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी वकिली केली. काही काळ ते भदरी संस्थानाधिपतींच्या दरबारी होते. पुढे त्यांनी कलकत्त्यात विचार साप्ताहिकाचे संपादक म्हणून (१९४०-४२) तसेच मुंबईत चित्रपटसृष्टीत पटकथाकार म्हणून (१९४२-४७) काम केले. १९४८ ते १९५७ पर्यंत ते लखनौ येथील नवजीवन या दैनिकाचे संपादक होते. १९५० पासून त्यांची आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर हिंदी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. उत्तर प्रदेशातील ‘भारती’ या साहित्यिक संस्थेचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले. वर्मांच्या साहित्यसेवेचा प्रारंभ कवितांनी झाला. मधुकण हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. मानवतावादी दृष्टिकोण त्यांच्या सर्व लेखनातून प्रकट होतो. त्यांचा भाग्यवादावर (दैववादावर) विशेष विश्वास होता. कविता छंदोबद्ध असावी, असा त्यांचा आग्रह होता. एक प्रकारची बेहोषी, कलंदरपणा व स्वच्छंदतावादी वृत्ती हे विशेष त्यांच्या काव्यात आढळतात. अनेक भारतीय भाषांत व इंग्रजीतही या कादंबरीचे भाषांतर झाले. या कादंबरीच्या आधारे चित्रपटही तयार करण्यात आला. माणसाच्या खऱ्या प्रेमाची वाट वासनेतून व प्रवृत्तीतून जात असते व खरे प्रेम हेच त्याच्या जीविताचे साफल्य, असे त्यांनी या कादंबरीत दाखविण्याचा प्रयत्नअ केला. त्यांच्या भूले बिसरे चित्र या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९६१) लाभला. राज्यसभेचे सन्माननीय सदस्य (१९७८), तसेच आकाशवाणीचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताबही (१९७१-७२) लाभला. प्रेमचंदांच्या नंतर समाजातील स्थित्यंतरांचे साहित्याच्या माध्यमातून इतके प्रभावी व प्रत्ययकारी चित्रण भगवतीबाबूंनीच केले. उ. एक दिन (१९४०), हमारी उलझन (१९४७) हे त्यांचे निबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. धुप्पल या छोट्या आत्मवृत्तात त्यांनी आपल्या प्रदीर्घ, संघर्षमय, सक्रिय जीवनाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. भगवतीचरण वर्मा यांचे ५ ऑक्टोबर १९८१ रोजी निधन झाले.

 • यशवंतबुवा जोशी

  आज ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांचा स्मृतिदिन. जन्म. १९२८यशवंत बाळकृष्ण जोशी हे त्यांचे पूर्ण नाव. गेली पाच दशके संगीतक्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे मूळचे ग्वाल्हेर घराण्याचे पं. यशवंतबुवा जोशी यांनी आग्रा घराण्याच्या संगीताचेही शिक्षण घेतले होते. जगन्नाथ पुरोहित व यशवंतबुवा मिराशी यांच्याकडून शास्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या पं. जोशी यांनी दमदार आवाज आणि साधेपणा या दोन्ही गुणांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. दोन्ही घराण्यांच्या संगीताचा वारसा त्यांनी जपला. भारतीय अभिजात संगीत कला सर्वत्र नेणारा गायक, अशी त्यांची ओळख होती. राम देशपांडे, आशा खाडिलकर, अर्चना कान्हेरे, शिवानंद पाटील, ओंकार दादरकर आदी त्यांचे शिष्य आहेत. यशवंतबुवा जोशी यंना २००३ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पं. यशवंतबुवा जोशी यांचे ५ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले

 • राजा उपाध्ये

  आज आज ज्येष्ठ संगीतकार न वा उपाध्ये ऊर्फ राजा उपाध्ये यांचा स्मृतीदिन. जन्म. ३ मे १९२८ राजा उपाध्ये यांनी नाटय़, चित्रपट क्षेत्रांत १९६० ते १९८० या काळात चांगलाच ठसा उमटविला होता. मुंबई आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त संगीतकार होते . पोस्टासारख्या रूक्ष खात्यात आपली नोकरी संभाळून ते आपला संगीताचा ध्यास पूर्ण करत होते . केवळ नशिबाची साथ कमी मिळाल्याने ते मागे राहिले. 'आई तुझा आशीर्वाद , अष्टविनायक श्रृतिदर्शन , गणराज नटला ,' चाफा बोलेना , मालवणी खाजा, त्या शामल संध्याकाळी, पंचमहाभूत स्तोत्र, तीर्थसाई क्षेत्रसाई अशा अनेक त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांना आपल्या सुमधूर स्वरांनी प्रथितयश गायक सुरेश वाडकर , अजित कडकडे ,उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर , शिवानंद पाटील, उदय उपाध्ये, मंगला केळकर यांनी कॅसेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले. 'संस्कार ' हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केला, तर ' बने सुहागन ' या हिंदी चित्रपटाची गाणी त्यांनी स्वरबद्ध केली होती, पण काही कारणाने तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. सहयाद्रीच सोनं, शांती संग्राम, पळसाला पाने तीन , अमलदार, व्याध संगीतिका ही त्यांनी ' संगीतबद्ध ' केलेली नाटके त्याकाळी लोकप्रिय झालीच तर ' गीतयामिनी ' हा राजाभाऊंनी संगीतबद्ध केलेला प्रकाश बोर्डवेकर यांच्या गीतांचा कार्यक्रमही त्यांनी रसिकांसाठी सादर केला होता त्याचे १५ ते २० प्रयोग झाले होते. 'सुधीर फडके चित्रपट गीत रजनी ' हा संगीतमय कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला होता या कार्यक्रमाचे ५०० प्रयोग झाले होते. 'अधीर आर्त घननीळ बरसती ', ' निराकार सकल ओंकार ', 'चंद्रकांती केतकी तू , या शामल संध्याकाळी ' अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली. राजाभाऊ उपाध्ये यांनी तरुणपणी सुरुवातीच्या काळात पं . राम मराठे , यशवंतबुवा जोशी, भरतेमास्तर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते , तर शाम कांबळी, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, राम कदम यांच्याबरोबर संगीतसाथ केली आहे. राजाभाऊ उपाध्ये यांच्या पत्नी मंगला उपाध्ये गोरेगावमधील एक नावाजलेली शाळा ' महाराष्ट्र विद्यालय ' या शाळेच्या संस्थापिका होत्या. राजाभाऊ उपाध्ये यांचे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले.

 • बाबूराव पै

  आज वितरक, निर्माता बाबूराव पै यांचा स्मृतीदिन. जन्म.१० मे १९०२ बाबूराव कृष्णराव पै हे चित्रपट क्षेत्रात मूव्ही मोघलम्हणून ओळखले जात. बाबूराव शिक्षण संपल्यावर बँकेत नोकरी करत असताना त्यांची मुंबईहून कराची येथे बदली झाली. तेथे त्यांची दादासाहेब तोरणे यांच्याशी भेट झाली. दोघांनाही चित्रपटांबद्दल आत्मीयता असल्याने दोघांनी मिळून चित्रपट वितरणाचा व्यवसाय सुरू केला. पंजाब, सिंध व वायव्य सरहद्द प्रांतामध्ये बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटांचे वितरण करण्यास सुरुवात केली. हा व्यवसायत्यांना लाभदायी ठरला.चित्रपटक्षेत्रातील संधी ओळखून बाबूराव पै व दादासाहे तोरणे या दोघांनी बँकेतील नोकरी सोडून कराचीहून मुंबईला प्रयाण केले. येथे त्यांनी प्रभात व आर्यन फिल्म कंपनीच्या चित्रपटांचे वितरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी मुव्ही कॅमेरा कंपनीची स्थापना केली आणि त्याद्वारे चित्रपट निर्मितीसाठी व चित्रीकरणासाठी लागणार्याथ गोष्टी निर्मात्यांना पुरवण्याचे काम सुरू केले. भारतात या दोघांनीच या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. १९२८-२९ च्या सुमारास फेमस पिक्चर्सया नावाने वितरण संस्था स्थापन करून संपूर्ण भारतात या संस्थेची कार्यालये सुरू केली. याच यंत्रणेच्या साहाय्याने प्रभातचा आयोध्येचा राजाहा चित्रपट ध्वनिमुद्रित झाला. रणजित, सागर व वाडिया या चित्रपट संस्थांनाही या दोघांनी ध्वनिमुद्रण यंत्रे पुरवली. यानंतर तोरणे यांनी दोराबजी कोल्हा यांच्या मदतीने नानासाहेब सरपोतदारांचा आर्यन स्टुडिओ विकत घेतला. सरस्वती सिनेटोनअसे त्याचे नामकरण करून त्याद्वारे श्यामसुंदरहा चित्रपट बनवला. त्यांच्या या वाटचालीत बाबूराव पै यांचा मोठा वाटा होता. मुंबईत व पुण्यात त्या वेळेस त्यांची जवळजवळ सव्वीस चित्रपटगृह होती. बाबूराव पै यांनी फेमस स्टुडिओची स्थापना केली. शांतारामबापूंनी झनक झनक पायल बाजेया चित्रपटाची निर्मिती करून प्रचंड यश मिळविले. त्या प्रसंगी बाबूराव पै यांनी पुढाकार घेऊन मुंबईत शिवाजी पार्क येथे चित्रपट व्यवसायिकांतर्फे शांतारामबापूंचा सत्कार घडवून, आणला. या सत्कार सोहळ्यात आचार्य अत्रे यांनी शांताराम,बापू यांना चित्रपतीही पदवी बहाल केली.बाबूराव पै यांचे ५ ऑक्टोबर १९७२ रोजी निधन झाले.


 • भरत नाट्य मंदिर

  आज पुण्यातील भरत नाट्य मंदिर चा वर्धापन दिन. भरत नाट्य मंदिर म्हटले, की डोळ्यांपुढे येतो पुण्यातल्या रंगकर्मी तरुणाईचा राबता. संस्था आणि नाट्यगृह वयस्कर असूनही दिवसरात्र तालमी, एकांकिकांचे प्रयोग, तांत्रिक तालमींमध्ये रंगून गेलेली असते. भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील सर्वात जुने नाट्यगृह. हे नाट्यगृह म्हणजे भरत नाट्य संशोधन मंडळाचा एक हिस्सा आहे. ज्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आणून सोडत. थोडक्यात, वाया गेलेल्या मुलांचे क्षेत्र म्हणजे नाटक, असे सामाजिक समीकरण होते, त्या काळात म्हणजे १८९४ साली दसर्यातच्या दिवशी, दत्तात्रेय फाटक, गोपाळ वाड, वामन काशीकर, दत्तात्रय परांजपे, दातार या १६ वर्षे वयाच्या हुशार अभ्यासू तरुणांनी 'स्टुडंटस् सोशल क्लब' या नाट्य मंडळाची स्थापना केली. अनेक शिक्षकही सभासद होऊन नाटकात काम करू लागले. अनेक तरुण स्त्रिया बॅकस्टेजला मदत करू लागल्या. 'नाटक्या' या तिरस्करणीय शब्दाला हळूहळू लोक विसरू लागले. महाराष्ट्रात १९०५ सालापासून नाट्य संमेलने सुरू झाली. त्या वेळी कोणतीच व्यावसायिक संघटना अस्तित्वात नसल्याने संमेलनांच्या छोट्या-मोठ्या जबाबदार्याव उचलून पहिल्या. १० पैकी ६ ते ७ नाट्य संमेलनांच्या यशात सोशल क्लबचा सिंहाचा वाटा होता. हे कार्य विधायक वाटल्यामुळे या संस्थेला लोकमान्य टिळकांचा पाठिंबा मिळाला. हे सरकारच्या लक्षात येतात सावधगिरी म्हणून ब्रिटिश शासकांनी या संस्थेवर आपले लोक नेमले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भरत मुनींना आदरांजली म्हणून 'स्टुडंटस् सोशल क्लब'चे नाव बदलून ते 'भरत नाट्य संशोधन मंदिर' असे करण्यात आले. एकांकिका ही अविष्कार पद्धती आजच्या तरुणांनी जवळची मानली आहे. ‘भरत नाट्य मंदिर’ या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात. त्यात आंतर बँक एकांकिका स्पर्धा, रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा, भरत करंडक, आयटी करंडक, कामगार कल्याण स्पर्धा, संस्कृत नाट्यस्पर्धा, एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा, मौनांतर (मूकनाट्य) स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा असे अनेक प्रयोग भरतमध्ये होतात. कुणी मानो अथवा न मानो, या मंचावर वावरलेल्या गतपिढ्यांची पुण्याईदेखील आहे. म्हणूनच पु.ल. देशपांडे, राजा परांजपे, राजाभाऊ नातू, राजा गोसावी, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे या साऱ्यांनी आणि अशा अनेकांनी भरतवर अपेक्षा विरहित प्रेम केले आहे.

 • श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी

  आज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार आणि उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे लेखक, रंगकर्मी व भाजपचे माजी राज्यसभा खासदार यांचा श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी जन्मदिन. जन्म. ५ ऑक्टोबर १९३४ चो रामस्वामी यांचा जन्म एका उच्चशिक्षित, उच्चवर्णीय ‌तामिळ कुटूंबात झाला. त्यांचे वडील श्रीनिवासन हे प्रख्यात वक्ते व वकील. . वडलांप्रमाणेच चो रामस्वामी हेही वकील झाले. दक्षिणेतील टीटीके उद्योगसमूह आणि अन्य काही उद्योगसमूहांचे कायदेविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आरंभी. परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही. पत्रकारिता आणि रंगभूमी ही दोन त्यांच्या आवडीची क्षेत्रे. त्यामुळे नंतर ते याच क्षेत्रात रमले. त्यांना असलेल्या कसल्याशा आजार वा व्याधीमुळे चो रामस्वामी यांच्या डोक्याचे केस तरुण वयातच कायमचे गेले आणि त्यांना टक्कल पडले. पण त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखीच उठावदार झाले. रंगीत चष्म्यामागचे त्यांचे लुकलुकणारे खट्याळ डोळे आणि जिभेवरची विलक्षण चुरचुरीत भाषा यामुळे ते अनेक नाटक-सिनेमांतून गाजले. जयललीतांसोबतही त्यांनी काही सिनेमांतून काम केलेले आहे. तुगलकप्रमाणेच त्यांचे संभवामी युगेयुगे हे नाटकही त्यातील विडंबनात्मक भाषेमुळे खूप गाजले. नाटककार, दिग्दर्शक, कलावंत अशा विविध नात्यांनी चो रामस्वामी यांनी अन्यही काही नाटके दिली. ‘तुघलक’ हे त्यांनी लिहिलेले नाटक एकेकाळी तामिळनाडूत विलक्षण लोकप्रिय होते. गिरीश कार्नाड लिखित तुघलक वेगळे आणि चो रामस्वामींचे तुघलक वेगळे. पुढे चो रामस्वामी यांनी त्याचा सिनेमाही काढला. याच नावाचे एक साप्ताहिकही नंतर सुरू केले. राजकीय उपहासात्मक, विडंबनात्मक लेखन आणि राजकीय व्यंगचित्रे यांच्या जोरावर एखादे साप्ताहिक किती लोकप्रिय होऊ शकते, याचे उदाहरण मार्मिक रुपाने मराठी पत्रकारीतेत आहे, त्यांनी २०० सिनेमांत अभिनय केला आहे. २३ नाटके आणि १४ सिनेमाचे संवादलेखन केले आहे तर चार सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या 'थेन्मोझियल' नाटकातल्या पात्रावरून त्यांना 'चो' हे नाव पडले.ते भाजप कडून राज्यसभेवरही गेले होते. त्या काळात त्यांनी दिल्लीच्या राजकीय व माध्यम वर्तुळातही आपली छाप पाडली होती. चो रामास्वामी हे 'तुघलक' या राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. चो रामस्वामी यांचे निधन ७ डिसेंबर २०१६ रोजी झाले.

 • रामनाथ गोएंका

  आज इंडियन एक्स्प्रे स वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोएंका यांचा स्मृतिदिन. जन्म.२२ एप्रिल १९०४ दरभंगा, बिहार येथे. रामनाथ गोएंका यांनी १९३२ मध्ये इंडियन एक्स्प्रेस सुरू केली आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार केला. त्यांनी पेरिया नाईकर स्ट्रीट येथे, मूळच्या मांडवा जवळच्या गावातून आलेल्या चौधरी नावाच्या कुटूंबासह आश्रय घेतला. भारताच्या आणीबाणीच्या काळात रामनाथ गोयंका हे काही स्वतंत्र उद्योजक आणि पत्रकारांपैकी एक होते जे इंदिरा गांधींचा विरोध दर्शविणाऱ्या सरकारकडून उभे होते. ते तिरुपतीच्या तीर्थयात्रेवर जात असत. रामनाथ गोएंका यांच्या नावाने ओळखले जाणारा पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा रामनाथ गोएंका पुरस्काराने गौरव केला जातो. हे पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचे पुरस्कार मानले जातात. रामनाथ गोएंका यांचे ५ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झाले.

 • यदुनाथ दत्तात्रय थत्ते

  आज ‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्मदिन. जन्म. ५ ऑक्टोबर १९२२महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. यदुनाथ दत्तात्रय थत्ते हे साने गुरुजी यांचे शिष्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती आचरणात आणली. १९५६ ते ८२ पर्यंत साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे ते संपादक होते. मराठी, हिंदीतून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. धर्मनिरपेक्ष नीतिशिक्षणाची दिशा दाखविणारे ‘प्रतिज्ञा’, राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणारे ‘आपला मान, आपला अभिमान’ हे पुस्तक, ही त्यांच्या पुरस्कार प्राप्त ग्रंथाची ठळक उदाहरणे. केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. त्यांच्या एका ग्रंथाला ‘सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर सुवर्णपदक’ही लाभले. साने गुरुजी कथामाला, बाबा आमटेंची भारतजोडो यात्रा, निगडित असणारे थत्ते ‘प्रेस कौन्सिल’चे अध्यक्षही होते. यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन १० मे १९९८ रोजी झाले.

 • सागर तळाशीकर

  आज अभिनेते,लेखक व दिग्दर्शक सागर तळाशीकर यांचा वाढदिवस. जन्म.५ ऑक्टोबर गेली पंचवीस हून अधिकवर्षं नाटक, सिनेमा आणि मालिकेत झळकणारा एक सोज्ज्वळ, सालस तरीही गंभीर असा चेहरा म्हणजे सागर तळाशीकर. सागर तळाशीकर हे कोल्हापूरचे कोल्हापूर येथील वांगी बोळात सारं बालपण या गेलं. पुढं तळाशीकर कुटुंब प्रतिभानगरात स्थायिक झाले. दरम्यान, विद्यापीठ हायस्कूल, गोखले कॉलेज ( जीकेजी ) आणि नंतर शहाजी लॉ कॉलेजला आपले एल.एल.बी. (गोल्ड मेडलिस्ट) शिक्षण पूर्ण केले. शहाजी लॉ कॉलेजला असतानाच 'वेटिंग फॉर गो टू' स्टेजवर आणलं आणि तिथूनच रंगदेवतेची सेवा सुरू झाली. पुढे प्रत्यय संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटक रंगमंचावर आली. अगदी 'किंग 'लिअर', 'राशोमान' पासून ते 'कोपनहेगन' पर्यंत, व्यावसायिक रंगभूमीवर 'डबल गेम', 'रंगनायक' या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'कृष्णप्रिया' या हिंदी नाटकाचे आजही भारतभर प्रयोग होतात. साठहून अधिक कथ्थक कलाकारांसह हे नाटक रंगमंचावर सादर होतं. त्याचं दिग्दर्शनही सागर तळाशीकर यांनीच केले आहे. पस्तीसहून अधिक सिनेमे, ओमपुरी व श्रेयस तळपदेसह 'हँगमन' हा इंग्लिश सिनेमा किंवा अगदी बॉलीवूडचेही पाच ते सहा चित्रपटात अभिनय केला आहे. 'पानिपत' या हिंदी चित्रपटात पण ते दिसले होते. तसेच त्यांनी बालगंधर्व, बाईमाणूस, गुलदस्ता, व्यक्ती आणि वल्ली,रमाई या चित्रपटातही अभिनय केला आहे. 'रमाई' या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका त्यांनी केली आहे. अवंतिका, असंभव, सोनियाचा उंबरठा, एका लग्नाची तिसरी गोष्ट,चार दिवस सासूचे, एक धागा सुखाचा, गुंतता हृदय हे,ललित २०५ या त्यांच्या मालिकाही गाजल्या. या क्षेत्रात अनेक राज्य पुरस्कार, झी गौरव, नाट्यगौरव असे अनेक पुरस्कार सागर यांना मिळाले आहेत. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी आणि सिनेमांतूनही आजवर त्यांनी भरपूर काही केले. पुढंही बरेच काही करायचे आहे.