या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- स्वच्छ भारत अभियान
- कौशल्य विकास
- एक भारत श्रेष्ठ भारत
- कृषी विपणन मधील एकवाक्यता
- आत्मनिर्भर भारत
- सबका साथ सबका विकास
- स्वस्थ भारत
- आरोग्य भारत
- आत्मनिर्भर भारत
- वन नेशन वन रेशन
- डिजिटल इंडिया

अंमलबजावणी या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

16
Sep 23
अमृत कलश यात्रा काढतांना लोकसहभागावर भर द्या - डॅा.पंकज आशिया

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेद्वारे घराघरातून मातीचे संकलन केले जात आहे. यात्रेत गावातील नागरिकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलेश यात्रेचे आयोजन करून मातीचे संकलन करण्यात येत आहे. या यात्रेचे आतापर्यंत झालेले काम व पुढील तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास चंदनकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. आता दि.30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने काढल्या जाणाऱ्या या यात्रेत प्रत्येक घरातून मुठभर मातीचे संकलन केले जातील. यात शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. ज्या कुटुंबांकडे शेती नाही, अशा कुटुंबांकडून चिमूटभर तांदुळ मातीच्या कलशामध्ये जमा केले जाणार आहे. प्रत्येक गावातून एक कलश तयार केला जातील. गटग्रामपंचायत असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातून स्वतंत्र कलश तयार केला जातील. प्रत्येक गावातून एक कलश तयार केल्यानंतर उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर तयार केलेल्या अमृत वाटीकेकरीता करण्यात येणार आहे. गावातून कलश यात्रा काढतांना वाद्य वाजवत उत्साहवर्धक वातावरणात काढण्यात यावी. माती व तांदुळाचे संकलन करतांना पंचप्रण शपथ घेण्यात यावी, असे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. जिल्ह्यात दि.1 ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत गावस्तरावरील प्रत्येकी एक याप्रमाणे गटविकास अधिकारी यांच्याकडे कलश जमा करून घेतले जातील. प्रत्येक गावातून आलेली माती एकत्र करून त्यातून एक कलश तयार केला जातील. उरलेली माती तालुकास्तरावर तयार केलेल्या अमृत वाटिकेसाठी उपयोगात आणली जातील. यादरम्यान तालुकाठिकाणी देखील अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सैन्यातील विरांच्या कुटुंबियांना सहभागी करून घेतले जातील. तालुक्यातील अमृत कलश जिल्हास्तरावर पोहोचविला जातील. सर्व तालुक्यातून जिल्हास्तरावर जमा झालेले कलश दोन स्वयंसेवकांद्वारे मुंबई येथे दि.22 के 27 ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी नेले जाणार आहे. मुंबई येथून हे कलश दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविले जातील. गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या या सर्व कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.

अधिक माहिती...
14
Sep 23
यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बैलपोळाचे आयोजन

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आझाद मैदान येथे आयोजित बैलपोळा उत्सवात केले. नगरपरिषदच्यावतीने आयोजित बैलपोळा उत्सव समारंभात पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उत्कृष्ट बैलजोडीधारकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आझाद मैदान येथे दरवर्षी प्रमाणे पारंपरिक बैलपोळा उत्सव भरविण्यात येतो. यंदाच्या वर्षी या उत्सवात 38 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. यातील परिक्षण मंडळाने निवडलेल्या पाच सर्वोत्कृष्ट बैलजोडी धारकांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांक सरदार चौधरी, द्वितीय क्रमांक शंकर कासार, तृतीय क्रमांक दिनेश तिवाडे, चौथा क्रमांक दिपक सुलभेवार आणि पाचवा क्रमांक भोला देवकर यांनी पटकावला. या विजेत्यांना पालकमंत्री श्री. राठोड यांच्याहस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, राजेंद्र डांगे, माजी सभापती गजानन इंगोले, रमेश अग्रवाल आणि शेतकरी व स्पर्धक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड संबोधित करतांना म्हणाले, पोळा सण भावी पिढीला समजला पाहिजे. सणाविषयी त्यांना शिकवण देणे गरजेचे आहे. आगामी काळात सण उत्सव उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न होईल, यासाठी नियोजन करण्यात येईल. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून त्यांचे आत्मबल व मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य, सन्मान निधी यासारख्या विविध योजनांतून लाभ दिला. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चांगले बियाणे, 24 तास वीजपूरवठा, पाणी आदी सूविधा देवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

अधिक माहिती...
14
Sep 23
सण उत्सव एकोपा व शांततेत साजरे करावेत - डॉ. पंकज आशिया

आगामी काळातील पारंपरिक सण, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण, उत्सव सर्वांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. पोलिस प्रशासनामार्फत उमरखेड येथील नगरपरिषद सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात झाली. यावेळी आ.नामदेव ससाणे, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार डॉ.आनंद देऊळगांवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे आपले पारंपरिक उत्सव आहे. हे उत्सव साजरे करतांना सलोखा बाळगणे फार महत्त्वपूर्ण आहे. या उत्सवादरम्यान अनूचित प्रकार घडू नये. आपसात तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हे सर्व सण एकोप्याने साजरे करावे. रस्त्यावरील खड्डयांचे काम सणांच्या अगोदर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी बांधकाम विभाग व नगरपरिषदेला केल्या. बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्तक राहावे. वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज मंडळाने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध धर्माचे पदाधिकारी, मंडळ, उत्सव समितीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक माहिती...
14
Sep 23
गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन

शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. या मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख, द्वितीय क्रमांकाच्या मंडळास अडीच लाख तर तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट मंडळास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. राज्यातील उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर गणेश मंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 16 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस दि.1 ऑक्टोबरपर्यंत करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
14
Sep 23
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्यवसाय कर्जावर 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने प्रामुख्याने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गाकरीता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यातील गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर महामंडळाच्यावतीने 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत दिली जाते. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन उद्योग, व्यवसाय स्थापन करणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींनी व्यवसाय सुरु केल्यास 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तीन व्यक्तींच्या व्यवसायासाठी 35 लाख, चार व्यक्तींच्या व्यवसायासाठी 45 लाख तर पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय स्थापन केल्यास 50 लाखापर्यंत योजनेंतर्गत बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने 12 टक्के दराने व्याज सवलत दिली जाते. ही सवलत 12 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत मंजूर केली जाते. त्यासाठी गटाने वेळेत कर्जाचा हप्ता भरणे आवश्यक आहे. वेळेत हप्ता भरल्यानंतर व्याज परताव्याची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा देखील नियमानुसार महामंडळाच्यावतीने दिला जातो. ही योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशांकरीता राबविली जाते. कौटूंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. लाभार्थ्याने स्थायिक, कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. योजनेंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एलएलपी, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट, संस्था लाभास पात्र आहे. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय, उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा करण्यात येतो. कर्ज प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्र योजनेच्या लाभासाठी मोबाईल क्रमांक व स्वत: ई-मेल आयडी जोडलेले आधारकार्ड, रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी दाखला, लाईट बील, रेशनकार्ड, गॅस बिल, बॅंक पासबुक, उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला, आयटी रिटर्न तसेच जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल आदी कागदपत्र आवश्यक आहे. योजनेची सविस्तर माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.

अधिक माहिती...
13
Sep 23
शासन आपल्या दारी अभियान ६६ हजार शेतकऱ्यांना २५३ कोटींचे प्रोत्साहन अनुदान

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यातील ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर लाभाचे वितरण ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमादरम्यान करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आला होता. शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे शेती कामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. पिककर्जाची उचल करुन नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा व प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान कर्जमुक्ती योजनेतून दिले जात आहे. या प्रोत्साहनपर योजनेंतर्गत आर्णी तालुक्यातील ५ हजार ८७५ शेतकऱ्यांना २१ कोटी ६५ लाख, बाभूळगाव तालुक्यातील २ हजार ५७३ शेतकऱ्यांना १० कोटी २० लाख, दारव्हा २ हजार २७६ शेतकऱ्यांनी ९ कोटी ४४ लाख, दिग्रस ४ हजार ९१६ शेतकऱ्यांना १७ कोटी ५० लाख, घाटंजी ३ हजार ६३१ शेतकऱ्यांना १४ कोटी ७२ लाख, कळंब १ हजार ९४३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख, केळापूर २ हजार ५५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख, महागाव ३ हजार ७१० शेतकऱ्यांना १२ कोटी ६९ लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील ३ हजार ८५१ शेतकऱ्यांना १६ कोटी २५ लाख, नेर २ हजार २२३ शेतकऱ्यांना८ कोटी २७ लाख, पुसद ९ हजार १८६ शेतकऱ्यांना २७ कोटी ९३ लाख, राळेगाव ४ हजार ३०९ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख, उमरखेड ७ हजार ७६२ शेतकऱ्यांना २६ कोटी ८०, वणी ७ हजार १४९ शेतकऱ्यांना ३१ कोटी ८१ लाख, यवतमाळ २ हजार ९४ शेतकऱ्यांना ८ कोटी १७ लाख आणि झरी जामणी तालुक्यातील २ हजार ७५३ शेतकऱ्यांना ११ कोटी १२ लाख असे एकूण ६६ हजार ८०६ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र होते. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले.

अधिक माहिती...
13
Sep 23
बेरोजगार युवकांना रोजगारासाठी रविवारी इंडस्ट्री मिट कौशल्य केंद्रे आपल्या दारी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता गुरुनानक भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, नागपूर येथे इंडस्ट्री मिट आयोजित करण्यात आली आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थ्‍ित राहणार आहे. या कार्यक्रमात “कौशल्य केंद्रे आपल्या दारी” या संकल्पनेतून नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज, सिक्युरिटी एजन्सी यांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ विनामूल्य उपलब्ध करणे, उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी शासन आणि उद्योग समूह यांच्यात सामंजस्य व समन्वय साधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील उद्योजक व औद्योगिक संघटना, मोठे हॉटेल्स, मॉल्स व बेरोजगार उमेदवारांनी या “इंडस्ट्री मिट” चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त वि. सा. शितोळे यांनी केले आहे.

अधिक माहिती...
13
Sep 23
महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर १२ हजार ५३६ अर्ज प्राप्त

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रूटी पूर्ण करण्याचे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एकूण १२ हजार ५३६ अर्ज ऑनलाईनरित्या प्राप्त झालेले आहेत. या अर्जापैकी १ हजार ८३७ लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकूण १२ हजार ५३६ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २ हजार ६२६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळलेली असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन त्यांच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविण्यात आलेले आहेत. तसेच महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालयाकडून सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्याकरिता भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात आलेले आहे, तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडून त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही. या अनुषंगाने सर्व त्रुटी युक्त अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन ०७२३२२४९१५० क्रमांकावर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी व प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटी पूर्तता करुन घ्यावी किंवा शेतकऱ्यांना मिळालेल्या युजर नेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी. यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. जे लाभार्थी दि. २४ सप्टेंबर २०२३ पर्यंत त्रुटी पूर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील. मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम त्रुटी पूर्तता करणान्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
13
Sep 23
मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय येथे कार्यशाळा संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालयात दि.११ सप्टें. २०२३ रोजी प्रवेश व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून डॉ. आर.ए. ठाकरे तसेच मार्गदर्शक डॉ. एफ.सी. रघुवंशी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय केंद्र अमरावती व शिष्यवृत्ती मार्गदर्शक श्री. रविंद्र तायडे वरिष्ठ सहाय्यक शिष्यवृत्ती विभाग य.च.म.मु. नाशिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती विभाग केंद्राचे श्री.विवेक गुल्हाने यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन डॉ. लाभशेटवार यांनी केले. या कार्यशाळा प्राचार्य राऊत व प्राचार्य गुंठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. रघुवंशी यांनी आपले विद्यापीठाचे प्रवेशकसे वाढवता येईल व येणार्‍या अडचणी कशा सोडवता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. तायडे व डॉ.आर.ए.ठाकरे यांनी समायोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अभ्यास केंद्राचे प्राचार्य, केंद्रसंयोजक, समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अतुल वानखडे, डॉ. निचत, डॉ. लाभशेटवार, प्रा. वाघमारे, प्रा. देवतळे, प्राचार्य धोटे, तांगडे मॅडम, वर्षा ढोंगे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. डॉ. भिंगारे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

अधिक माहिती...
13
Sep 23
आदिवासी लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. परंतु लाभ मंजूर होऊनही कागदपत्रांची पुर्तता केली जात नसल्याने अशा लाभार्थ्यांचा निधी अखर्चित राहतो. त्यामुळे लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्यावतीने न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गंत आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. त्यात शेळीगटासाठी अर्थसहाय्य, बियाणेसाठी अर्थसहाय्य, तुषार सिंचन, ताडपत्री तसेच आदिवासी मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलसाठी अर्थसहाय्य अशा विविध स्वरुपाच्या योजनांचा समावेश आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ रोख रक्कमेच्या स्वरुपात डीबीटीद्वारे देण्यात येतो. सदर लाभ प्रथम हप्ता 75 टक्के व साहित्याची खरेदी केल्यानंतर 25 टक्के अशा स्वरूपात देण्यात येतो. आदिवासी लाभार्थी प्रथम हप्त्यासाठी आवश्यक असलेले लाभार्थ्यांचे बँकेचे विवरण जसे बँक खाते पुस्तकाची झेरॉक्स आणून देत नाही. काही लाभार्थी पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी साहित्य खरेदी केल्याची बील, पावती आणून देत नाही. अशा कारणांमुळे लाभार्थ्यांना देय लाभाची रक्कम वेळेवर खर्च होत नाही. सदर योजनेंतर्गत सन 2016-17 पासून डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राच्या प्रती मिळत नसल्याने सदर योजनेचा निधी वर्षानुवर्ष अखर्चित राहतो. त्यामुळे पांढरकवडा प्रकल्पांतर्गंत येत असलेल्या केळापूर, घाटंजी, मारेगांव, झरी जामणी, राळेगांव, यवतमाळ, वणी व बाभूळगांव या तालुक्यातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची तातडीने पुर्तता करावी. लाभार्थांना वारंवार कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी यापुर्वी देखील कळविण्यात आलेले आहे. गेल्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या लाभार्थी मेळाव्यामध्ये सुध्दा कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. असे असून सुध्दा अद्यापही काही लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कागदपत्राच्या पुर्ततेसाठी दि.8 ऑक्टोंबर ही अंतीम मुदत आहे. या मुदतीपर्यंत लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी. या मुदतीनंतर मंजूर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
12
Sep 23
नेत्रदान पंधरवड्यात ३९१ जणांची नेत्रदानासाठी संमती

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात जिल्ह्यातील ३९१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी संमती दिली तर विविध ठिकाणी झालेल्या नेत्रतपासणी शिबिरात ९ हजार ६२३ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. यवतमाळच्या सामान्य रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आयुर्वेदिक महाविद्यालय येथे या नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन दि. २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाजोरीया , आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाणे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, नेत्र विभाग प्रमुख डॉ. वाघ, डॉ. आकाश भोजणे आदी तज्ञ डॉक्टरांनी नेत्रदानाविषयी मार्गदर्शन केले. तसेच दि. २६ ऑगस्ट रोजी रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे मोफत नेत्रतपासणी, आरोग्य तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील वाहनचालक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी मिळून ३२७ नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी २५० रुग्णांच्या चष्म्याचे नंबर काढण्यात आले व ११ रुग्ण मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. या पंधरवड्यादरम्यान महात्मा जोतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर पथनाट्यातून जनजागृती केली. या पंधरवड्यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांमार्फत नेत्र तपासणी शिबिरे व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या नेत्रदान पंधरवड्यात २५३ रुग्णांची मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. तर एकूण ३९१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी संमती देवुन नेत्रदान संमतीपत्र भरून दिले.

अधिक माहिती...
12
Sep 23
मध केंद्र योजना : साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान मिळणार

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशापालनासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण आणि साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र व्यक्ती किंवा संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे. या योजनेंतर्गत ५० टक्के स्वगुतंवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष किंवा छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करणे हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता ठरविण्यात आली असून त्यानुसार वैयक्तिक मधपाळांसाठी अर्जदार हा साक्षर असावा. वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळांसाठी किमान १० वी पास असावा. वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे. त्यांच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्थांसाठी पात्रतेनुसार संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. योजनेच्या अटी व शर्तींनुसार लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, तिसरा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे किंवा 07232-244791 मो.न. 9420771535 या क्रमांकावर किंवा संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5 मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806, दूरध्वनी-02168 260264 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
12
Sep 23
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालयातील सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला सह दिवाणी न्यायाधीश एस.एस. मतकर, प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता जी. ए. पराते, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टी. जैन, सचिव ए. बी. बजाज,, दिवाणी न्यायाधीश डि. एस. थोरात, न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पि.एल.व्ही., तसेच पक्षकार उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत अनेक उदाहरण देत न्यायालयातील व न्यायालया बाहेरील प्रकरणे व वाद मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय विधी सेवा समिती येथे मध्यस्थीकरिता ठेवल्या जातात. मध्यस्थीमध्ये दोन्ही पक्षांना न्याय मिळतो. तसेच मध्यस्थीची प्रक्रिया ६० दिवसापर्यंत चालवली जाते. मध्यस्थी हा पक्षकारांना सर्वात चांगला उपाय आहे. संवाद संपला तर वादाला सुरूवात होते. मध्यस्थीबाबत गोपनियता बाळगल्या जाते असे श्री हांडे यांनी सांगितले. पक्षकार, अधिवक्ता, न्यायाधीश यांची मध्यस्थी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. मध्यस्थी हे संवादाचे साधन आहे. वाद शांततेत मिटविण्याकरिता खुप पर्याय आहेत. दोन्ही पक्षकारांना मध्यस्थीपर्यंत पोहचविणे व मध्यस्थीच्या फायद्यांबाबत सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. मतकर यांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता जी.ए.पराते हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रकरणे कोणत्याही टप्प्यावर असतांना दावा हा मध्यस्थीकडे पाठविला जावू शकतो. स्वीकारण्या योग्य वाटेल असा तडजोडीचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आल्यास प्रकरण, समुपदेशन, लोकअदालत, मध्यस्थ यांचेकडे पाठविता येते. मध्यस्थीने प्रकरण निकाली काढल्यास पक्षकार यांची पैसा व वेळेची बचत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अधिवक्ता तरुणा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश डी. एस. थोरात यांनी केले.

अधिक माहिती...
12
Sep 23
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा अंतर्गत जुलैमध्ये आयटीआय परीक्षेचे निकाल घोषित झालेले आहेत. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी यवतमाळच्या आयटीआयमध्ये सुझुकी मोटर गुजरात प्रा. लिमिटेड हंसलपुर, गुजरात या नामांकित कंपनीचा भरती मेळावा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित केला आहे. या कंपनीमार्फत अॅप्रेन्टीस करीता १६ हजार ९०० तसेच फिक्स टर्म करीता २१ हजार दरमहा वेतन दिले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, मोटार मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझल, मेकॅनिक ट्रॅक्टर, टुल अॅण्ड डायमेकर, पिपीओ व पेन्टर जनरल व्यवसायासाठी जागा उपलब्ध आहेत. यासाठी इयत्ता १० वी मध्ये किमान ४० टक्के गुण, आयटीआयमध्ये किमान ५० टक्के गुण तसेच रूजु होतेवेळी वय १८ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. या संधीचा जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदरावांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी केले आहे.

अधिक माहिती...
12
Sep 23
रिझर्व बँकेच्यावतीने एमएसएमई उद्योजकांसाठी बैठक

भारतीय रिझर्व बँक नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी टाऊन हॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक प्रमुख बँकांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आली होती. भारतीय रिझर्व बँक, नागपूर येथील प्रादेशिक संचालक सचिन शेंडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी.एस.रावत, भारतीय स्टेट बँकेचे महाप्रबंधक राकेश कुमार यादव यांच्यासह भारतीय स्टेट बँक व इतर बँकांचे वरिष्ठ बँक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील एमएसएमई कर्जदारांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान एमएसएमईशी संबंधित योजनांवरील विविध सत्रात झेड प्रमाणपत्र, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या योजनांचा समावेश करण्यात आला. आपल्या उद्घाटनपर भाषणात श्री.शेंडे यांनी बैठकीचे उद्दिष्ट आणि वेळेवर आणि सुलभ कर्जाद्वारे एमएसएमईचे पालन पोषण करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी सहभागींना एमएसएमईसाठी असलेल्या विद्यमान योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. पारंपरिक कारागीर आणि लघुउद्योजकांना पाठींबा देण्यासाठी बँका पुढे येत आहेत, हे सकारात्मक लक्षण असल्याचे ते म्हणाले. खुल्या चर्चासत्रादरम्यान, अधिकाऱ्यांनी सहभागी च्या प्रश्नांना उत्तरे दिली.

अधिक माहिती...
11
Sep 23
महिला विद्यालय यवतमाळ येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव

अखिल भारतीय विज्ञान नाट्यमहोत्सव २०२३ अंतर्गत महिला विद्यालय, महादेव मंदिर रोड, यवतमाळ येथे नुकतेच नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील मान्यता प्राप्त शाळेतील इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या तालुका स्तरीयविज्ञान नाट्य महोत्सवात एकूण पाच विषय देण्यात आले.यामध्ये `अन्न हे श्रेष्ठ आहार, खाद्य सुरक्षा, दैनंदिन जिवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सद्याची प्रगती, समाजातील अंधश्रद्धा ' या विषयाचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस््थानी महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उपाध्ये मॅडम यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून गर्व्हमेंट हायस्कुल गोधणी रोड येथील प्राचार्य इक्बाल सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी दिंडोरकर विषय साधन व्यक्ती यांनी केले. या विज्ञान नाट्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्रीमती वेरूळकर मॅडम, हिमांशु गिराम, सुशिला घोटेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत विषय निहाय १०० गुण देण्यात आले होते. या विज्ञान नाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेकरीता साधनव्यक्ती वैशाली गायकवाड, आशिया शेख, सिटीतले सर, जोशी सर, देशमुख सर यांनी सहकार्य केले. उपस्थितीतांचे आभार साधनव्यक्ती वैशाली गायकवाड यांनी मानले. विज्ञान नाट्य महोत्सव यवतमाळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात घेण्यात आला. असे प्रसिद्धीपत्रकात राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
11
Sep 23
तालुक्यातील शिक्षकांना मिळाले बाललैंगिक संरक्षणाचे धडे

अर्पण स्वयंसेवी संस्था मुंबई व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ११.०९.२०२३ला सहकार भवन आर्णी रोड यवतमाळ येथे तालुक्यातील जिल्हा परिषद कार्यरत शिक्षकाचे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. आज किशोरवयीन शालेय विद्यार्थी १८ वर्षाखालील शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित नाहीत त्यांचे विविध प्रकारचे शोषण होत आहे हा अन्याय, अत्याचार विद्यार्थ्यांवर होत असतांना शिक्षकांची भूमिका काय व शिक्षकांनी काय करावे. प्रत्येक विद्यार्थी शाळेत सुरक्षित असला पाहिजे त्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. व शिक्षकांना `पोक्सो' कायद्याचा व नियमाचा अभ्यास असणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षा शिक्षण अंतर्गत हे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे. बाललैंगिक शोषण आणि व्यक्तीगत सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी अर्पण स्वयंसेवी संस्था मुंबईच्या श्रद्धा जाधव, संतोष खरात परिश्रम घेत आहे. या प्रसंगी तालुक्यातील विलास राठोड, राजहंस मेंढे, विकास झाडे, संतोष मरगडे, ज्ञानेश्वर भगत, यशवंत घोटे, मिलिंद देशपांडे, प्रभाकर खोडे, हिम्मत ठाकरे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिक्षण विभाग, पंचायत समिती यवतमाळच्या विस्तार अधिकारी नलिनी वंजारी, वर्षा भुतनेर, दीपलक्ष्मी ठाकरे यांच्या नियंत्रणात प्रशिक्षण देण्यात आले व यवतमाळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
8
Sep 23
राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

अधिक माहिती...
8
Sep 23
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

जिल्ह्यातील शेतकरी, स्वयंसहायता गट, बेरोजगार तरुण आणि नवउद्योजकांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी कृषि विभागाची केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2021 पासून पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली असून या योजनेंजर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना 35 टक्के अनुदान शासन देत आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे उद्योग सुरू करण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत केंद्र-राज्य खर्चाचे प्रमाण 60:40 असे राहील. या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. योजनेअंतर्गत विविध राज्य व केंद्र योजनांमधून एकत्रीकरणाचा लाभ घेण्याची लाभार्थ्यांना मुभा राहील. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व आकांक्षित जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येईल असे या योजनेची वैशिष्ट्ये आहे. योजनेतील समाविष्ट घटक व पात्र लाभार्थ्यांचे निकष ठरविण्यात आले असून वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तिक मालकी किंवा भागीदारी, खाजगी कंपनी ,अशासकीय संस्था यांच्या उपक्रमांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडिट लिंक सबसिडी आधारावर अनुदान विहित करण्यात येईल. लाभार्थी गुंतवणूक किमान 10 टक्के आवश्यक असून उर्वरित रक्कम बँक कर्ज म्हणून घेण्यास मुभा राहील. सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ (सामायिक पायाभूत सुविधा) या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ व संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांना सार्वजनिक पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन इत्यादी करिता प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के,जास्तीत जास्त 3 कोटी विहित करण्यात येईल.उत्पादनाच्या मार्केटिंग व ब्रॅन्डींगसाठी शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समितीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे शिफारस केलेले वैयक्तिक लाभार्थी तसेच योजनेंतर्गत बीज भांडवल लाभ मिळालेले स्वयं सहाय्यता गटांचे लाभार्थी करिता प्रशिक्षण सुविधा खर्चच्या 100 टक्के अनुदान देण्यात येईल. स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल व छोट्या अवजारांची खरेदी करण्याकरिता अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित कमाल 10 सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक भांडवल म्हणून फेडरेशनमार्फत किमान 40 हजार रुपये प्रति सदस्य अनुज्ञेय राहील. कोणते उद्योग करता येणार : या योजनेंतर्गत सर्व सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना लाभ देण्यात येत असून एक जिल्हा एक उत्पादनाला प्राधान्य देण्यात येत आहे. यानुसार दाल मिल, दुध व दुग्धजन्य पदार्थांवरील प्रक्रिया, गुळ तयार करणे, हळद मिरची व धनिया पावडर तयार करणे,मसाले, ॲलोवेरा जेल व ज्यूस तयार करणे, पापड उद्योग, पौष्टिक तृणधान्य उत्पादने, कडधान्य उत्पादने, फळे उत्पादने, भाजीपाला उत्पादने आदी अन्न प्रक्रिया उद्योग करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा नोडल अधिकारी , उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, उमेदच्या जिल्हा ग्रामीण किंवा शहरी विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष, समुदाय संस्थांना संपर्क करावा. किंवा www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

अधिक माहिती...
8
Sep 23
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळ्यांचा वापर करावा

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांनी फेरोमन सापळे लावून गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री प्रमोद लहाळे यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात एकूण 4 लाख 71 हजार 527 हे. क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झालेली असून पीक सध्या पाती, फुले, तसेच बोंडे धरणाच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळलेला आहे. त्याचप्रमाणे बाभूळगाव दारव्हा व कळंब तालुक्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. गुलाबी बोंडअळीची तीव्रता ठरविण्याच्या दृष्टीने प्रति हेक्टरी पाच फेरोमन सापळे व त्यामध्ये पेक्टिनोफेरा लुर्स लावण्यात यावी. या ट्रॅपचे निरीक्षण दररोज सकाळी घेण्यात यावे. ट्रॅपमध्ये गुलाबी बोंडअळीचे आठ ते दहा नर पतंग सतत तीन दिवस आढळल्यास शिफारशीतील मात्रे प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे नरपतंग ट्रॅपमध्ये पकडून गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण मिळवायचे असेल त्यांनी प्रति हेक्टरी 20 फेरोमन ट्रॅपचा वापर करावा. जिल्ह्यातील ठराविक गावातील क्लस्टरमध्ये कृषी विभागामार्फत फेरोमन ट्रॅप देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना खाजगीरित्या बाजारातून फेरोमन ट्रॅप विकत घ्यायचे असल्यास त्यांनी हरित बायो कंट्रोल लॅब यांना 9422167481 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोकार्डचा सुद्धा वापरता येतील. यवतमाळातील दत्त चौकातील विदर्भ बायोटेक लॅब येथून शेतकऱ्यांना ट्रायको कार्ड घेता येईल. त्याकरिता 9422869423 किंवा 9168186174 व 9511851517 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यामध्ये विविध बियाणे कंपन्यामार्फत शंभर टक्के अनुदानावर काही प्रमाणात फेरोमन ट्रॅपचे निवडक गावात प्रातिनिधीक स्वरूपात वाटप होणार आहे. तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या दृष्टीने काही अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाला 9403229991 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

अधिक माहिती...